एमपीआयडी'नुसार आरोपींवर कारवाई
आर्थिक फसवणूक प्रकरणात न्यायालयाचा आदेश
पुणे, ता. २४ : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण (एमपीआयडी) कायद्यानुसार कारवाई करा, असा आदेश विशेष न्यायालय एस. जे. काळे यांनी कोथरूड पोलिसांना दिला आहे. हा गुन्हा पाच वर्षांपूर्वी घडला होता.
अमरेश मधुकर राव (रा. कोथरूड) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून अद्वैत चंद्रशेखर दातार, नीलम अद्वैत दातार, चंद्रशेखर दातार यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपीविरुद्ध 'एमपीआयडी' कायद्यानुसार कारवाई झाली नाही. ती करावी अशी मागणी राव यांच्यातर्फेअॅड. वैभव जठार, अँड. एम. जे. पठाण यांनी न्यायालयाकडे केली होती.
आरोपींनी राव यांना शेअर मार्केट आणि सोन्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांना जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. आरोपींनी सुमारे पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे राव यांनी तक्रारीत नमूद केले होते.
या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी 'एमपीआयडी' कायद्यानुसार करणे आवश्यक होते. पोलिसांनी या गुन्ह्यात ४४ साक्षीदारांचे जवाब नोंदविले असून, त्यांचीही फसवणूक झाली आहे. सर्व रक्कम एकूण २ कोटी ४४लाख ४८ हजार रुपये इतकी आहे. गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्यांच्यावर 'एमपीआयडीनुसार ' आरोपपत्र दाखल होणे आवश्यक होते, असा दावा राव यांच्या वकिलांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य मानला.

